किशोरीताईंच बंदिश ह्या विषयावरती एक workshop दिनांक ७ जून २०१५ रोजी पुण्यामध्ये attend केलं. त्यामधून मला उमगलेल्या काही मुद्द्यांचा सारांश इथे लिहिण्याचा घाट घालीत आहे.
Workshop ची सुरवात भारतीय संगीतातील एक ढोबळ पण अतिशय मूलभूत अशा एका सिद्धांतानी केली. " सा रे ग प ध सा… सा ध प ग रे सा" ही एक scale आहे. ह्याला ना भूप म्हणता येईल ना देसकार. scale म्हणजे राग नव्हे. जाणकार श्रोते आणि कलाकारांमध्ये तत्काळ असा विचार आला असेल कि राग भेद हे phrases मुळे होतात स्वरांमुळे नाही. हे जरी सत्य असलं, तरी ताईंनी देसकार थोडा चंचल प्रकृतीचा आहे आणि भूप हा शांत प्रकृतीचा आहे असे सांगत तसं गाऊन दाखवलं. म्हणजे राग हे phrases मुळे वेगळे होतात ही तशी 'technical' गोष्ट झाली. राग हे मुळात त्यांच्यातल्या भावामुळे वेगळे होतात. पूर्ण workshop (आणि ताईंच्या गाण्यातही) हेच सूत्र दिसून येतं.
रागातील स्वरांना धक्का न लागू देता जी बंदिश आपण गाऊ शकू त्यालाच खरी बंदिश म्हणावयाचे असे मत ताईंनी व्यक्त केले. बंदिशीच्या शब्दांचे उच्चार हे स्वरांना इजा करणारे नसावेत. रागाचा प्राण हे त्याचे स्वर आणि भाव होय. बंदिश म्हणजे स्वरांची शाब्दिक व्यवस्था. रागाच्या भावाला व्यक्त करणारी शाब्दिक भूमिका म्हणजे बंदिश. त्या राग भावाला इजा होऊ नये असे शब्दोच्चार कलाकाराने केले पहिजेत. मराठी भाषेतील कठीण व्यंजनं ह्यांचा उच्चार ताईंनी अतिषय सहज असा करून दाखवला. उदाहरणार्थ विठ्ठल ह्या शब्दामधले ठ हे अक्षर ट+ह+अ असे उच्चारले असता ते स्वराला तितकेसे त्रास देत नाही. म्हणजे विठ्ठल हा शब्द विट+ह+ल असा उच्चार करणे जास्ती योग्य ठरेल. म्हणूनच ब्रज भाषेमध्ये कान्हा, कन्हरवा पिहरवा लछ्मी असे शब्द वापरले जातात. जर शब्दांमुळे स्वरांची शक्ती कमी होणार असेल तर पूर्णपणे clearly शब्द म्हणायलाच हवेत असे नाही! श्रोत्यांना शब्द कळतील इतके ते स्पष्ट असतील तरी पुरे आहे.
रागाचा भाव आणि बंदिशीचा भाव हा जवळचा असला पाहिजे. कुठल्याही रागात कुठलीही बंदिश गाता येउच शकत नाही. बंदिशीच्या भावाप्रमाणे देखील गायनाची लय आणि उच्चारण करायला हवे. उदाहरणार्थ येरी आली पिया बिन ह्या बंदिशीचा अर्थ लक्षात घेत ती मध्यलयीतच शोभून दिसेल. अति द्रुत लयीमध्ये ती शोभून दिसणार नाही. चतर सुघर बैय्या हे बंदिश थोडी चंचल आहे म्हणून ती अतिविलाम्बित शोभणार नाही. त्याची गती थोडीशी वाढवायला हवी. अति द्रुत लयीतल्या बंदिशी, तराणे हे रागाच्या भावाला घातक ठरतात. तिथे उठून दिसते ती फक्त तयारी आणि लयीची कसरत. ह्या सगळ्या कसरतीमध्ये रागाचा भाव लांब राहातो. असे होणे चुकीचे असल्याने अति द्रुत लयीतल्या बंदिशींना आणि तराण्यांना फारसे महत्व नाहीये.
जयपूर घराण्यामध्ये बंदिशीचा स्थायी आणि अंतरा गायनामध्ये अतिषय शिस्त बद्धता असते. त्यामध्ये कुठेही बदल होत नाही. तो जश्याचा तसा गायला जातो. स्थायी अंतरा एका पाठोपाठ गाणं हे एक पूर्णत्व प्राप्त झाल्याचा लक्षण आहे. आधी फक्त स्थायी गायची म्हणजे अर्धाच भाग सांगायचा आणि नंतर अंतरा म्हणजे उरलेला भाग सांगायचा हे योग्य नाही. बोल आलाप शिस्तबद्ध हवी. शब्दांची मोड तोड करून चालत नाही. तालाचा उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. बोल आलाप संपवून शब्दांची मोडतोड न करता बरोबर समेवर येणं ह्याला महत्व आहे. बंदिशीचं उच्चारण ह्यासाठी वाणी तयार करावी लागते. त्यासाठी साहित्याचा अभ्यास हवा. ज्याला स्वर, भाषा आणि काव्य ह्यामध्ये प्रभुत्व आहे त्यानेच बंदिशी कराव्या.
वेगवेगळ्या बंदिशींमुळे रागाचे दर्शन अधिक चांगले होण्यास मदत होते का? ह्या प्रश्नाला ताईंनी असे उत्तर दिले कि राग स्वरूप, भाव कळण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही वा ती भासू नये. असे वाटले कि कदाचित प्रश्न असा होता कि बंदिशीच्या शब्दांमुळे नाही तर त्यात असलेल्या चालना मुळे राग दर्शनास मदत होते का? मला असे वाटते कि ताईंनी ह्या प्रश्नाचेही उत्तर दिले आहे ते असे - उदाहरणार्थ यमन मधल्या ४० बंदिशी घ्या. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या phrases मिळतील. परंतु, यमनाचा मूळ स्वभाव बदलणार नाही. तो तसाच असतो. ताईंनी असाही उल्लेख केला कि भरपूर बंदिशी असल्या तर त्याचा technically फायदा होईल कलाकाराला. परंतु यमन समजायला ४० बंदिशींची गरज नाहीये कारण यमन चा मूळ भाव हा एकच असतो. आपण असं म्हणतो कि एखादी व्यक्ती आपल्याला shirt pant मधे वेगळी दिसते आणि kurta पायजाम्यात वेगळी भासते. असा विचार जर रागाला apply केला तर कदाचित ४० बंदिशीतून यमन तसा दिसू शकेल. असं राग स्वरूप दिसणं म्हणजेच 'technically' फायदा होईल असा ताई म्हणतात असे वाटते. तथापि असे वाटते कि ताईंचा मुद्दा असा आहे कि ४० बंदिशींच्या phrases मधून आपण यमनच बाह्य रूप कदाचित बघू शकू पण त्यामुळे यमनचा मूळ भाव बदलतो का? तर नाही!! ज्या प्रमाणे एखादी व्यक्ती वेषभूषेवरून वेगळी दिसेल खरी पण त्याने त्या व्यक्ती चा मूळ स्वभाव बदलतो का? तसेच रागाचे आहे असे ताईंना सुचवायचे होते असे वाटते. बंदिशींमुळे रागाच्या phrases मिळतील पण रागाचा मूळ स्वभाव कळण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. तो कळण्यासाठी 'राग' साधनाच करावी लागते. रागाच्या phrases आल्या म्हणजे राग आला असे नाही. राग हा एक भाव आहे. (म्हणून कितीही बंदिशी असल्या तरी रागाचा भाव तोच राहतो). माझ्या मते मुद्दा असा आहे कि workshop च्या सुरवातीला सांगितल्या प्रमाणे scale म्हणजे राग नाहीये. ४० बंदिशींमध्ये तुम्हाला यमनच्या scale ची वेगवेगळी रुपं दिसतील पण म्हणून राग यमन दिसेलच असे नाही. रागाच्या भावाला अनुसरून जर कोणी ४० बंदिशी करत असेल तर त्यात काहीच गैर नाहीये
Workshop च्या शेवटी श्रोत्यांमध्ये अशी चर्चा झाली कि ताई खूप contradictory बोलत होत्या. वास्तविक पाहता, ते contradiction हे कशाशी होतं हे समजणे गरजेचे अहे. माझ्या मते ताईंच्या बोलण्यात contradiction नव्हतं. Contradiction होता ते श्रोत्यांच्या मनातील संगीताची एक चौकट (framework) आणि ताई सांगत असलेल्या सांगीतिक विचारांची चौकट ह्यामध्ये होतं. पूर्ण workshop मधे अमुक प्रश्नाला अमुक असे ठाम उत्तर असं कधी दिसून आलं नाही. पूर्ण workshop मधे मांडलेल्या एकंदर मुद्द्यांवरून सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आपली शोधणं गरजेचे आहे असे वाटले!
Comments